पालघर - भारतीय रेल्वेने किसान रेल्वेच्या माध्यमातून डहाणू तालुक्यातील उत्पादित चिकू फळाला 20-22 तासात दिल्ली मंडईमध्ये पोहोचविण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे येथील शेतकरी व बागायतदारांचे अर्थकारण बदलले असून त्याबाबत एका बागायतदाराने कवितेच्या माध्यमातून व्यक्त केलेल्या भावना रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट केली आहे.
किसान रेल्वेच्या माध्यमातून कमी खर्चात डहाणू येथील चिकूची वाहतूक -
जानेवारी महिन्याच्या अखेरपासून डहाणू येथून सहा डब्यांमध्ये सुमारे 60 टन वाहतूक करणारी किसान रेल गाडी येथील भौगोलिक मानांकन प्राप्त चिकू फळाला दिल्ली येथील बाजारपेठेत 22 तासात पोहोचवत आहे. ट्रकद्वारे वाहतुकीला लागणाऱ्या आठ ते नऊ रुपये प्रति किलो खर्चाच्या तुलनेत रेल्वेने वाहतूक केल्यास त्याकरिता दोन रुपयांपेक्षा कमी खर्च येत आहे. आठवड्यातून तीन वेळा विशेष शेतमाल घेऊन जाणारी गाडी डहाणू रोड स्थानकातून निघत असून त्याचा लाभ येथील शेतकरी व बागायतदारांना मिळत आहे. या योजनेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता गेल्या आठवड्यापासून पश्चिम रेल्वेने सहा डबल ऐवजी बारा डब्यांची मालगाडी सुरू केली आहे. किसान रेल्वेमुळे पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील घोलवड चिकूला परत मागणी वाढली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून संकटात सापडलेला येथील चिकू उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आपल्या शेतीतून भरघोस उत्पन्न घेऊ लागला आहे.
![railway-minister-tweets-poem-of-farmer](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-01-chikoofarmersbenefitedfromkisanrailwayagricultureministertweetspoemoffarmer-vis-byte-mh10044_30032021131709_3003f_1617090429_255.jpg)
डहाणू येथील चिकू उत्पादक शेतकरी प्रीत पाटील आणि त्याचा सहकारी कृष्णा जैस्वाल हे आत्तापर्यंत स्थानिक बाजारपेठेतच आपला चिक्कू विक्री करत होते. व्यापारी सांगेल त्या भावात त्यांना चूक विकावा लागत होता. उत्तम दर्जाची असताना देखील योग्य हमीभाव न मिळाल्याने त्यांच्यासारख्या शेकडो शेतकर्यांच्या पदरी निराशाच पडत होती. मात्र भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू केल्याने चिकू उत्पादक शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळाली असून यावरच येथील शेतकरी प्रीत पाटील आणि सहकारी कृष्णा यांनी कविता लिहिली होती हीच कविता केंद्रीय मंत्री यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केली.
![railway-minister-tweets-poem-of-farmer](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-01-chikoofarmersbenefitedfromkisanrailwayagricultureministertweetspoemoffarmer-vis-byte-mh10044_30032021131709_3003f_1617090429_766.jpg)