पालघर - पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून त्यामुळे चिकन विक्रीची दुकाने आणि पोल्ट्रीफार्म बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरातील चिकन विक्री दुकानांवरील कोंबड्या, अंडी, खासगी पक्षी तसेच पशुखाद्यची विल्हेवाट लावण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
नियमानुसार विल्हेवाट
पालघर शहरातील सूर्या कॉलनी येथील जिल्हा परिषदेच्या शासकीय पोल्ट्रीत अचानक 45 कोंबड्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले, अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बर्ड फ्लूमुळे या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बर्ड फ्लू आढळल्यानंतर या शासकीय पोल्ट्रीमधील 500हून अधिक कोंबड्या आणि अंडी तसेच पशुखाद्य याची नियमानुसार विल्हेवाट लावण्यात आली आहे.
चिकन विक्री व पोल्ट्री फार्म पुढील आदेशापर्यंत बंद
शासकीय पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरातील चिकन विक्री दुकानांवरील कोंबड्या, अंडी, खासगी पक्षी तसेच पशुखाद्यची विल्हेवाट लावण्याचे आदेशही देण्यात आले असून खबरदारीची उपाययोजना म्हणून सर्व चिकन विक्रीची दुकाने आणि पोल्ट्री फार्म पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत.
चिकन पूर्णपणे उकळून व शिजवून खावे
जिल्ह्यात स्थापन केलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकामार्फत इतर कुकूटपालन केंद्रांमध्ये व चिकन विक्री दुकानांमध्ये तपासणी करून खबरदारीच्या सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येत आहेत. अंडी, चिकन खाताना पूर्णपणे उकळून व शिजवून खाण्याचे जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.