वसई (पालघर) - वसईच्या पूर्व गोलानी परिसरात असलेल्या ए. वी. उद्योग, राजप्रभा इन्डस्ट्री येथील प्लास्टिक, पुठ्ठे व केमिकल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. या आगीमध्ये आठ औद्योगिक गाळे जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
ही आग सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास लागली. या औद्योगिक वसाहतीला लागूनच नागरी वसाहत आहे. सुदैवाने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच 5 फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि 4 पाण्याचे टॅंकर घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप पालव यांनी दिली. या इंडस्ट्रीमध्ये एकूण 36 गाळे आसून, 8 गाळे जळून खाक झाले आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.