पालघर - तोक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका पालघर जिल्ह्यातील किनारपट्टी भागाला बसला आहे. चक्रीवादळात कृषी, मासेमारी, बागायतदार, वीटभट्टी क्षेत्र तसेच घरे व सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी व आढावा घेण्यासाठी सहा जणांचे केंद्रीय अधिकाऱ्यांचे पथक आज (गुरुवार) पालघर जिल्हा दौर्यावर आले आहे. जिल्ह्यातील जांभूळगाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या बहाडोली येथे या पथकाने जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. त्याचबरोबर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
पालघर जिल्ह्यात चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सहा सदस्यीय केंद्रीय पथक जिल्ह्यातील विविध क्षेत्रात झालेल्या नुकसानीबाबत पाहणी दौरा करत आहे. केंद्रातील प्रशासकिय अधिकारी, केंद्रीय वित्त विभागाचे संचालक, ऊर्जा मंत्रालयातील केंद्रीय अधीक्षक अभियंता प्रमुख, कृषी विभागाचे संचालक, रस्ते परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता, मत्स्यव्यवसाय विभागाचे वैज्ञानिक अशा केंद्रीय तज्ञांचा या पथकात समावेश आहे. या पथकाने पालघर जिल्ह्यातील पालघर व इतर ठिकाणी चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाला भेटी देऊन तेथील पाहणी केली. पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रशासकीय प्रमुखांसोबत नुकसानीचा आढावा घेत केंद्राला अहवाल सादर करण्यात येणार आहे.
![केंद्रीय पथकाने केली पाहणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-02-centralteamvistspalghar-byte-mh10044_03062021175245_0306f_1622722965_385.jpg)