पालघर - एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असले तरी ते सहीपुरते आहेत. पण, मातोश्रीच्या संमतीशिवाय ते एकही फाईल सही करू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांची अडचण झाली आहे. ते मार्ग शोधत आहेत, असा गौप्यस्फोट केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला.
हेही वाचा - मुलाच्या अंत्यविधीसाठी घेतले 500 रुपये, सावकारी छळाला कंटाळून वडिलांची आत्महत्या
'जन आशीर्वाद यात्रे'च्या निमित्ताने नारायण राणे शनिवारी वसईत आले होते. या वेळी त्यांनी नालासोपारा येथील रिजन्सी हॉलमध्ये पत्रकारांसोबत संवाद साधला. राज्याचे नगर विकास खाते मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे व मिलिंद नार्वेकर चालवत आहेत, असा आरोप राणे यांनी या दोघांची नावे न घेता केला. यामुळे एकनाथ शिंदे यांची अडचण झाली आहे. ते मार्ग शोधत आहेत, असा गौप्यस्फोट राणे यांनी केला.
एकनाथ शिंदे आपल्या पक्षात येतील का? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता, शिंदेच नाही तर अनेक जण येण्याच्या तयारीत असल्याचे ते नारायण राणे म्हणाले.
भर पावसात यात्रा
दरम्यान, केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा भर पावसात झाली. वसई-विरार शहरात सकाळपासूनच पावसाने जोर धरला होता. अशा कोसळणाऱ्या पावसातच वसई पूर्वेतील मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोटी येथून या यात्रेची सुरुवात झाली. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. ढोल-ताशाच्या गजरात जंगी स्वागत झाल्यानंतर या दौऱ्यात राणे यांनी वसई-विरारमधील विविध ठिकाणी भेट दिल्या.
हेही वाचा - पालघर जिल्हा मुख्यालयाचे लोकार्पण