पालघर - लोकल रेल्वे रद्द केल्यामुळे आणि एक्स्प्रेस रेल्वेचे वेळापत्रक बदलण्याच्या निषेधार्थ पालघर सफाळे आणि केळवे स्थानकात संतप्त प्रवाश्यांकडून रेल रोको आंदोलन कऱण्यात आले होते. त्यापैकी ७०० आंदोलकांवर पालघर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, या आंदोलकांपैकी चार जणांना अटक करून त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
पालघर, सफाळे स्थानकातील 700 आंदोलकांवर गुन्हे दाखल..
लोकल रेल्वे रद्द केल्यामुळे आणि एक्स्प्रेस रेल्वेच्या वेळापत्रकात करण्यात आलेल्या बदलाच्या निषेधार्थ बुधवार 2 डिसेंबर रोजी पहाटे संतप्त प्रवाशांनी पालघर, सफाळे आणि केळवे रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन केले होते. पालघर रेल्वे स्थानकात आंदोलन करणाऱ्या 250 व सफाळे स्थानकात रेल रोको करणाऱ्या 450 अशा एकूण 700 प्रवासी आंदोलकांवर पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आंदोलकांपैकी 4 आंदोलकांना अटक करून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. व्हिडीओ फुटेजच्या आधारे आंदोलन करणाऱ्या इतर प्रवाशांचा पोलीस शोध घेत आहेत.
सौराष्ट्र एक्सप्रेस व लोकलच्या वेळेत बदल..
मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सौराष्ट्र एक्सप्रेसचे वेळापत्रक बदलल्याने व लोकल रद्द करण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. सौराष्ट्र एक्सप्रेस पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी पालघर रेल्वे स्थानकात येते. मात्र, आता या गाडीची वेळ बदलून ती पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी करण्यात आली. त्याचसोबत पालघर स्थानकात येणारी 5 वाजून 15 मिनिटांची लोकल रद्द करण्यात येणार असल्याच्या निर्णयामुळे पालघर रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले. यामुळे पश्चिम रेल्वे सेवा कोलमडली होती.
प्रवाशांकडून निवेदन..
प्रवाशांकडून स्टेशन मास्तरांना लोकल रद्द करण्याचा तसेच एक्सप्रेसच्या वेळापत्रकात झालेला बदल पूर्ववत करण्याबाबत निवेदन देण्यात आले. तर काही प्रवाशांनी मुंबई सेंट्रल कार्यालयात जाऊन देखील आपल्या मागण्यांबाबत निवेदन दिले होते.
लोकल रद्द करण्याचा निर्णय मागे..
पालघर, केळवे रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांनी केलेल्या रेल्वे रोको आंदोलनाची दखल घेत पश्चिम रेल्वेने पहाटे 5:15 वाजता मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल रद्द न करण्याचा निर्णय घेतला आहे.