पालघर - बोईसर येथे परराज्यातील कामगार आणि मजुरांची गावी पाठवण्याच्या नावाखाली काही दलालांनी 3 ते 4 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. फसवणूक करणाऱ्या एका महिला आणि तिच्या पतीला बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा... कोरोनाच्या संकट काळातून आत्मविश्वास व कृतीतून बाहेर पडू शकतो : नितीन गडकरी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या या तिसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश येथील मजुरांनी आपल्या गावाची वाट धरायला सुरुवात केली आहे.
पालघर जिल्ह्यातील बोईसर हे मोठे औद्योगिक कार्यक्षेत्र असून येथील तारापूर औद्योगिक क्षेत्रात अनेक कारखान्यात काम करणारे मजूर जशी वाहन व्यवस्था होईल, तसे आपल्या गावाकडे परंतु लागले आहेत. आत्तापर्यंत पालघर मधून विशेष ट्रेनने काही मजूर गावी परतले आहेत. मात्र, अजूनही अनेक मजूर अडकून पडले असून मंगळवारी बोईसरमध्ये या मजुरांनी मोठी गर्दी करून गोंधळ घातला. मात्र, या कामगार, मजुरांना गावी पाठवण्याच्या नावाखाली काही दलाल 3 ते 4 हजार रुपये घेऊन फसवणूक करत असल्याचे धक्कादायक बाबही समोर आली आहे. बोईसरमधील काही मजुरांची फसवणूक करणाऱ्या एका महिला आणि तिच्या पतीला बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतले असून बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.