पालघर - चीननंतर आता संपुर्ण जगात कोरोनाची दहशत पहायला मिळत आहे. देशात आणि राज्यात देखील कोरोनाचे संशयित रुग्ण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणच्या यात्रा रद्द करण्याचे निर्णय घेण्यात आले आहे. त्यामुळेच पालघर जिल्ह्यातील मोखाडा येथील प्रसिद्ध 'बोहाड यात्रा' आणि विक्रमगड तालुक्यातील 'वेहेलपाडा यात्रा' रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी दिले आहे.
हेही वाचा... 'कोरोना'मुळे नाथषष्ठी सोहळा रद्द; दिंड्या व व्यावसायिक निघाले परतीच्या वाटेवर
कोरोना व्हायरसचा राज्यात देखील शिरकाव झाल्याने त्यावर उपाययोजना म्हणून पालघर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. यामुळे देवस्थान तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आवश्यकता नसलेले किंवा सावधगिरी म्हणून सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, जव्हार, मोखाडा, विक्रमगड या भागात महत्त्वाचा असलेला बोहाडा हा आनंदोत्सवही यावर्षी मर्यादित केला गेला आहे. मोखाडा येथील 'बोहाड यात्रा' जगदंबा उत्सव तसेच विक्रमगड तालुक्यातील 'वेहेलपाडा यात्रा' रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिले आहेत.

मोखाडा येथील बोहाड उत्सवात आदिवासी समाजातील पारंपरिक वाद्यांच्या तालावर आदिवासी समाजातील देवदेवतांचे मुखवटे घालून मुखवटे नाचवण्याची प्रथा आहे. या उत्सवाला जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील अनेक आदिवासी बांधव आवर्जून हजेरी लावतात. मात्र, यावेळी कोरोना व्हायरसमुळे या उत्सवावर देखील विरजण पडले आहे. मोखाडा येथील बोहाड यात्रा व विक्रमगड तालुक्यातील वेहेलपाडा यात्रा रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र, धार्मिक पूजाविधी करण्याला परवानगी देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारे गर्दी जमेल अशा प्रकारचा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हा उत्सव आता मर्यादित स्वरुपात साजरा केला जाणार आहे.