पालघर - जिल्ह्यातील बोईसर भागात अज्ञातांकडून 'भाजप मुक्त पालघर जिल्हा' असे बॅनर लावण्यात आले आहेत. यामुळे सध्या बोईसर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बॅनरवर कमळ आणि कपबशी उलटी केली आहे. भाजपचे प्रदेश आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांसह माजी आमदार पास्कल धनारे यांचे फोटो छापून भाजप मुक्तीचे शिल्पकार, असे लिहिण्यात आले आहे.
बोईसरमध्ये ठिकठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच संबंधित पोस्ट समाज माध्यमांमध्ये व्हायरल करण्यात येत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप व त्यांच्या संलग्न संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. दरम्यान, बोईसर पोलिसांनी तातडीने हे बॅनर हटवले आहेत.
ऑगस्ट २०१४ मध्ये पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडे वसई, नालासोपारा व बोईसर, भाजपकडे विक्रमगड व डहाणू आणि शिवसेनेकडे पालघर असे राजकीय बलाबल होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला ३ जागा, माकपकडे १, राष्ट्रवादी काँग्रेसकडे १ तर शिवसेनेकडे १, असे राजकीय बलाबल झाले असून भाजपला एकही जागा जिंकता आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपमुक्त जिल्हाचे बॅनर लावण्यात आले आहेत.