वाडा तालुका (पालघर) : वाडा नगरपंचायतीकडून घनकचरा गाड्या खरेदी आणि पंप हाऊस खरेदी व दुरुस्तीत अपव्यवहार झाल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला आहे. याबाबत भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांच्याकडे तक्रारीचे निवेदन सादर केले आहे. तसेच, या निविदा ठरावाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाडा नगरपंचायत हद्दीत घनकचराकरिता 5 नवीन गाड्या, किंमत रुपये 29 लाख 72 हजार आणि पंप हाऊस नवीन खरेदी व दुरुस्तीसाठी किंमत रुपये 72 लाख रुपये अशा दोन्ही विषयासंदर्भात नगरपंचायतीची स्थायी समितीची बैठक फक्त कागदावर दर्शवून टेंडर पास केले आहेत. तसेच अशी कुठलीही बैठक झाली नसून स्थायी समितीच्या सदस्यांच्या उपरोक्ष टेंडर पास करण्यात आल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा - 'नाणार'बाबत सरकारची भूमिका स्पष्ट; विरोध मावळत असल्याबाबत भविष्यात चर्चा केली जाईल - पालकमंत्री अनिल परब
दिनांक 1 जानेवारी 2020 पासून ते आतापर्यंत झालेल्या सभेचे इतिवृत्त आणि सबंधित रजिस्टर सहीत सिल करावे. ते ताब्यात घ्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तर, यावर बोलताना वाडा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्या विशाखा पाटील यांनी, रद्द झालेल्या मीटिंगमध्ये माझे अनुमोदक म्हणून नाव घेणे चुकीचे आहे, असे दुरध्वनीवरुन बोलताना माहिती दिली आहे.
तसेच, याविषयी त्यांनी नगर पंचायतीच्या नगराध्क्षा, मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे. वाडा नगरपंचायतीवर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची सत्ता आहे. तर भाजपा इथे विरोधी पक्षाच्या बाकावर आहे.