पालघर - वसई-विरार महानगरपालिकेच्या अनागोंदी व ढिसाळ कारभाराबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना, भाजप, आरपीआय, आगरी सेना, श्रमजीवी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार संघटना 'महायुती'च्या माध्यमातून एकत्र येत शुक्रवारी विरार येथील पालिका मुख्यालयावर मोर्चा काढत मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी महापालिकेचे प्रतिकात्मक श्राद्ध घालण्यात आले.
यावेळी पालघर लोकसभेचे खासदार राजेंद्र गावित यांनी ही महापालिका बरखास्त करावी यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार असल्याचेही सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर, आगरी सेनेचे जिल्हाप्रमुख जनार्दन पाटील, तालुकाप्रमुख प्रविण म्हाप्रळकर, तालुकाप्रमुख जितेंद्र शिंदे, भाजप जिल्हाप्रमुख सुभाष साटम, भाजपचे मनोज पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे, प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव, प्रवीण म्हाप्रळकर यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा - वसईत काँग्रेसला धक्का; विजय पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश, विधानसभा लढणार?
वसई विरारमध्ये सलग दुसऱ्या वर्षीही निर्माण झालेली पूरपरिस्थिती, साथीचे रोग, रस्त्यांची झालेली चाळण, वाहतूक कोंडी व अनियमीत पाणी व विजपुरवठा यामुळे सर्वसामान्य नागरीक मेटाकुटीस आलेले आहेत. वसई-विरार महानगरपालिकेला जाणीव करून देण्यासाठी व जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. सुमारे सात हजारांहून अधिक नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. पालिका मुख्यालयासमोर हा मोर्चा आल्यानंतर पालिकेच्या नावाने मूंडण करून पालिकेचे विधीवत श्राद्ध घालण्यात आले. त्यानंतर पालिका आयुक्त बळीराम पवार यांना मोर्च्यातील शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी पालिका आयुक्त बळीराम पवार यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या एकूण त्याचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.