पालघर - जव्हार-मोखाडा-त्रंबकेश्वर रस्त्यावर मोखाडा तालुक्यातील मोरचोंडी येथील पुलाला पुन्हा भगदाड पडले आहे. मात्र, याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असून या रस्त्याची वेळीच दुरुस्ती न झाल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.
मागील महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे याच मोरचुंडी येथील पुलाला मोठे भगदाड पडून हा रस्ता खचला होता. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात भूमिगत तारा टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले असून त्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची अशीच दुरवस्था असून सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन रस्ते दुरूस्त करावी अशी मागणी होत आहे.