पालघर - डहाणू तालुक्यातील खानीव गावातील जगंलात असणाऱ्या दगडांवर भू-कलेचा आविष्कार साकारण्यात आला आहे. जंगलातील काळ्या दगडांवर पांढऱ्या रंगाचे पट्टे ओढून भू-कला साकारण्यात आली आहे. जंगलात मिळेल त्या साहित्याने ही भू-कला साकारण्यात आली आहे. या भू-कलेमुळे निसर्गातील सौंदर्यात आणखी भर पडली असून यामुळे पर्यटकदेखील आकर्षित होत आहे.
जांभूळ झाडाची फांदी, शुद्ध चुन्याचा वापर
सूर्या नदीच्या अर्धशुष्क पात्रात भू-कला साकारण्यात आली आहे. खानीव येथील गर्द झाडीतून जाणाऱ्या ओहळात काळ्या दगडांवर शुद्ध चुन्याचे पट्टे मारून या आकर्षक आकार दिल्याने ही भू- कला जंगल सफरींना आकर्षित करीत आहे. रंगकामासाठी जांभूळ झाडाची फांदी आणि शुद्ध चुना वापरण्यात आला आहे. शुद्ध चुन्याचा वापर केल्याने नदीतील पाण्याला आणि भूभागाला हानी पोहोचणार नाही. दगडांच्या पाण्यात पडणाऱ्या प्रतिबिंबाने एक वेगळीच छटा निर्माण होते. वास्तुविशारद प्रतीक धानमेहेर आणि मुंबईमधील वास्तुविशारद विस्मयी कारंडे आणि राज्यातील विविध भागांतून आलेल्या १४ कलाकारांनी दोन दिवसांत हा भूकलेचा आविष्कार साकारला आहे.
![भू कलेचा अविष्कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-01-bhukalaincreatedinkhaniv-vis-byte-mh10044_23032021115351_2303f_1616480631_372.jpg)
भू-कला म्हणजे काय?
भू-कला ही साधारण १९७० च्या दशकात नावारूपास आलेली कला असून अँडी गोल्डस्वर्दी या महान कलाकाराने या कलेला आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवून दिले. कोणतेही साधन न वापरता, जंगलात मिळेल त्या साहित्याने कला साकारणे म्हणजे भू-कला. जगातील बहुतांश आदिवासी समाज अशाच कलांमधून व्यक्त होत आला आहे. कित्येकदा जंगलात, हिमालयात किंवा नदीकिनारी फिरायला गेल्यावर त्या भागाचे छायाचित्र काढणे इतकेच काही ते आपले त्या भागाशी नाते. पण काही वेळ तिथे व्यतीत करून तेथील निसर्गाला समजून ही कला रूप घेते. भलेही ही कला तात्पुरती असली तरी सामान्यांच्या मनात तिचे खोल अस्तित्व निर्माण होते.
![भू कलेचा अविष्कार](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pal-01-bhukalaincreatedinkhaniv-vis-byte-mh10044_23032021115351_2303f_1616480631_270.jpg)