पालघर - थकीत कर्ज वसुली करण्यास गेलेल्या बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर कर्जदार व त्याच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाणगाव पोलीस ठाणे हद्दीतील उर्से येथे घडली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राच्या कासा-चारोटी नाका शाखेचे व्यवस्थापक गणेश घंटे कर्जवसुलीसाठी गेले असता कर्जदार राजकुमार पाटील याने त्याच्या साथीदारांसह जीवघेणा हल्ला केला. आरोपीविरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हल्लेखोरावर आहे 15 लाखांहून अधिकचे कर्ज -
उर्से येथील राजकुमार पाटील यांनी मागील काही वर्षांपूर्वी बँक ऑफ महाराष्ट्रकडून सात लाखांचे कर्ज घेतले होते. त्यानंतर घेतलेले कर्ज आणि व्याज असे मिळून जवळपास पंधरा लाख रुपयांपेक्षा अधिकचे राजकुमार पाटील यांच्यावर कर्ज आहे.
बँकेच्या कर्जाची वसुली करण्यास जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला कर्जदारकडून दमदाटी होत करून राजकुमार पाटील हा कर्ज फेडण्यास टाळाटाळ करत होता. बँक ऑफ महाराष्ट्राच्या कासा- चारोटी नाकाचे कर्मचारी मागील अनेक महिन्यांपासून खेटे मारूनही कर्जदार कर्ज भरत नसल्याने बँकेच्या परवानगीने शाखा व्यवस्थापक गणेश घंटे यांनी स्वतः कर्जवसुलीस जाण्याचा निर्णय घेतला.
कर्जदार व त्याच्या दोन साथीदारांचा शाखा व्यवस्थापकावर हल्ला -
स्वतः कर्जवसुलीस जाण्याचा निर्णय घेतलेल्या बँकेचे शाखा व्यवस्थापक गणेश घंटे उर्से येथे कर्जदार राजकुमार पाटील यांच्या घरी गेले. शाखा व्यवस्थापकांनी राजकुमार पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे सांगताच कर्जदाराकडून गणेश घंटे य यांच्यावर हल्ला करण्यात आला. कर्जदाराच्या इतर दोन साथीदारांनीही घटनास्थळी धाव घेत गणेश घंटे यांना जबर मारहाण केली.
हल्लेखोर आरोपी अटकेत -
बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी प्रमुख आरोपी राजकुमार पाटील याला वाणगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीविरोधात वाणगाव पोलीस ठाण्यात 353, 332 आणि 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.