पालघर - शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी बंड करून आपला नवीन गट स्थापन केल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक आमदार व शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. यामध्ये पालघर जिल्हा सुद्धा मागे राहिला नाही. पालघर जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु शिंदे गटात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी विद्यमान आमदार व खासदार सामील झाल्यामुळे शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. शिंदे गटात सामील झालेल्या पालघर जिल्ह्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हकालपट्टी करून त्यांच्या जागी नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
'हे' आहेत नवनियुक्त पदाधिकारी : पालघर शिवसेना उपनेतेपदी उदय बंधू पाटील, पालघर भिवंडी ठाणे समन्यवयकपदी उत्तम पिंपळे, पालघर लोकसभा जिल्हासंपर्क प्रमुखपदी केतन पाटील, पालघर लोकसभा जिल्हासह संपर्कप्रमुखपदी निलेश गंधे, पालघर विक्रमगड विधानसभा जिल्हाप्रमुखपदी वैभव संखे, वसई- नालासोपारा विधानसभा जिल्हा प्रमुखपदी पंकज देशमुख, आणि डहाणू -बोईसर विधानसभा जिल्हा प्रमुखपदी वसंत चव्हाण, या नवीन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पालघर जिल्ह्यात शिवसेना मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी जाहीर केल्याचे एका प्रसिद्धस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.
'नव्या जोमाने काम करु' : शिवसेना ही संघर्षातून वाढलेली आहे. उद्धव ठाकरेंनी जी आम्हाला जबाबदारी दिली आहे ती आम्ही प्रामाणिकपणे पार पाडू. उदय बंधू पाटील यांच्या रूपाने पालघर जिल्ह्याला चांगला नेते मिळाले आहेत, आम्ही सर्व शिवसैनिक हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या तालमीत वाढलेलो आहोत. हा सर्व पट्टा शिवसैनिकांचा आहे. त्यामुळे जे पक्ष सोडून गेले याचा जास्त काही फरक पडणार नाही. आम्ही पुन्हा नव्या जोमाने पालघर जिल्ह्यात शिवसेना उभी करू, अशी प्रतिक्रिया पालघर विक्रमगड विधानसभेचे जिल्हा प्रमुख वैभव संखे यांनी दिली आहे.
हेही वाचा - Deepali Syed Statement : वाद आणि मान-अपमान बाजूला ठेवून शिंदे व ठाकरेंनी एकत्र यावे- दिपाली सय्यद