पालघर- विरार शहरातील खानिवडे तसेच खर्डी येथील तानसा आणि वैतरणा नदीच्या पात्रात विनापरवाना रेती उत्खनन केले जात होते. या माहितीच्या आधारे पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथकाने या वाळू उत्खननाच्या ठिकाणी सापळा रचून धाड टाकली. शनिवारी सायंकाळी सुरू केलेल्या या कारवाईत तब्बल 152 सक्शन पंप, 1650 ब्रास वाळू, 230 बोटी, 1 जेसीबी असा एकूण 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पालघर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
या धाडीत खर्डी येथून 74 लाख 9 हजारांची 750 ब्रास वाळू, 15 लाखांचा 1 जेसीबी, 1 कोटी 80 लाखांच्या 80 बोटी, 50 लाखांचे 50 सक्शन पंप असा एकूण 2 कोटी 99 लाख 9 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर दुसऱ्या धाडीत खानिवडे बंदरातून 83 लाख 97 हजार 150 रुपयांची 850 ब्रास वाळू, 1 कोटी 2 लाखांचे 102 सक्शन पंप, 3 कोटी रुपयांच्या 150 बोटी आणि 4 लाख 93 हजार 950 रुपयांची क्रशर जवळील 50 ब्रास वाळू साठा असा एकूण 4 करोड 90 लाख 91 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दोन्ही कारवाई मिळून एकूण 152 सक्शन पंप, 1650 ब्रास वाळू, 230 बोटी, 1 जेसीबी असा 7 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वसई तालुक्यातील इतिहासात आजपर्यंतची ही पहिली मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.
या कारवाईत आरोपी विरोधात विरार पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करून दोन्ही उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पुढील तपास देण्यात आला आहे. या कारवाईवेळी वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, विरार, नालासोपारा, पालघर येथील उपविभागीय अधिकारी आणि इतर अधिकारी व पोलीस कर्मचारी हजर होते.