पालघर - भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. तसेच आषाढी वारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या पूजेबाबतही विरोधी भूमिका घेतली आहे. याच्या निषेधार्थ डहाणू येथील चारोटी येथे शिवसेनेतर्फे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पालघर विधानसभा आमदार श्रीनिवास वनगा, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेश शाह यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. पडळकर यांनी केलेली टीका ही स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी केली असून पुन्हा जर त्यांनी अशा प्रकारची व्यक्तव्य केली तर त्यांना दारात जाऊन सरळ करू, असा इशारा पालघरचे शिवसेनेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी दिला.
काय आहे प्रकरण -
पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त विधान केले. गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे की, 'शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचे नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढेही चालू ठेवतील. त्यांच्याकडे कोणतीही विचारधारा, अजेंडा, व्हिजन नाही. फक्त छोट्या समूह घटकांना भडकवून आपल्या बाजूने करुन घ्यायचे आणि नंतर त्यांच्यावरच अन्याय करायचे त्यांची भूमिका आहे.' असे विधान पडळकर यांनी केले होते.