पालघर - डहाणू तालुक्यातील बहुचर्चित वाढवण बंदराला केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी तत्वतः मान्यता देऊन ५९ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर लगेचच वाढवण आणि आसपासच्या गावांमध्ये आक्रोशाचा सूर उमटू लागला आहे. वाढवण बंदराला स्थानिकांचा तीव्र विरोध असूनही शक्रवारी डहाणू नगरपालिका क्षेत्रात केंद्र शासनाच्या वाढवण बंदर दिलेल्या मंजुरीबद्दल अभिनंदनाचे व निर्णयाच्या स्वागताचे फलक झळकू लागले आहेत. अज्ञात स्थानिकांनी या अभिनंदनाच्या फलकांवर काळे फासून आपला निषेध व्यक्त केला आहे.
केंद्र शासनाच्या निर्णयानंतर स्थानिकांमध्ये प्रचंड आक्रोश निर्माण झाला असून, मोठे व तीव्र जन आंदोलन छेडणार असल्याचे वाढवण बंदरविरोधी संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.