पालघर - वसईतील तुंगारेश्वर पर्वतावरील सदानंद बाबांचे आश्रम तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र त्यानंतर बाबांच्या भाविकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. त्याचा निषेध म्हणून कोणतीही तोडफोड किंवा रास्ता रोको न करता शांततेच्या वातावरणात भजन करत अनोखे आंदोलन केले. यावेळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, प्रांत अधिकारी दीपक क्षीरसागर, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, आमदार नरेंद्र मेहता, गायक दादुस पाटील, भिवंडी आगरीसेना अध्यक्ष सोन्या पाटील, जनार्धन पाटील, कैलास पाटील यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले की, सदानंद बाबांचे आश्रम भक्तांचे श्रद्धास्थान आहे. सर्वांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. न्यायालयाचा आदर ठेवून चांगले वकील उभे करू, तसेच न्यायालयात कागदपत्रांचा न्यायालयात पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
खासदार राजेंद्र गावित म्हणाले की, सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला आहे, त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हरियाणाच्या धर्तीवर याचिका दाखल करु. केंद्र सरकारने तिथल्या अश्रामाबाबत जो निर्णय घ्यायचा ठरला आहे. तशा पद्धतीने याही ठिकाणी निर्णय घ्यावा. बालयोगी आश्रमाविषयी योग्यप्रकारे सुप्रीम कोर्टात मांडणी न केल्याने हा तांत्रिक मुद्दा निर्माण झाला आहे. सुप्रीम कोर्टाचा आदर ठेवून त्याला पर्यायी मार्ग काढू. हा आश्रम वाचवण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खासदार गावित यांनी दिले. यावेळी बाबांचा भक्त आगरी लोकसंगीताचा गायक दादुस यांनी येथील माहोल पाहून आश्रमाला न्याय मिळेल, अशी भावना व्यक्त केली आहे.