पालघर - मीरारोड - काशिमीरा भागातील शिवसेनेचे नगरसेवक कमलेश यशवंत भोईर याला 10 हजारांची लाच घेताना लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी मध्यस्थामार्फत भोईरने लाच मागितली होती. या प्रकरणी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री मध्यस्थासह भोईरला अटक केली आहे.
तक्रारदारांच्या घराच्या पोटमाळ्याचे बांधकाम चालू आहे. यासाठी तक्रारदारांनी मिरा-भाईंदर महापालिकेची परवानगी घेतली नाही. घराच्या पोटमाळ्याचे काम चालू ठेवायचे असल्यास 25 हजार रूपये द्यावे लागतील, अशी मागणी नगरसेवक भोईरने तक्रारदारकडे केली. तसेच पैसे न दिल्यास महापालिका अधिकाऱ्यांना सांगून तक्रारदारांच्या घराचे चालू असलेले पोटमाळ्याचे बांधकाम पाडून टाकू, असे तक्रारदाराला सांगण्यात आले. तडजोडीअंती पहिला हप्ता म्हणून 10 हजार रूपये लाचेची रक्कम देण्याचे ठरले.
याबाबतची तक्रार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे येथे केली. त्यानंतर 10 हजार रुपये लाचेची रक्कम मध्यस्थांमार्फत स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मध्यस्थ तसेच नगरसेवक कमलेश भोईरला रंगेहात पकडले.