पालघर - जिल्ह्यात सर्व 6 विधानसभा मतदारसंघामध्ये अंदाजे 59.5 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघांपैकी डहाणू विधानसभा मतदारसंघात 60.63 टक्के, विक्रमगड 69 टक्के, पालघर 44.09 टक्के, बोईसर 67 टक्के, नालासोपारा 51.47 टक्के आणि वसई- 64 टक्के इतके मतदान झाले आहे.
हेही वाचा - पालघरमध्ये 18 ते 20 गावांचा मतदानावर बहिष्कार; वाढवण बंदराला विरोध
मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्ह्यात एकूण 2 हजार 193 मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. त्यापैकी ग्रामीण भागात 1 हजार 160 मतदान केंद्रे असून शहरी भागांत 1 हजार 33 मतदान केंद्रे होती. मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर 14 हजार 114 अधिकारी-कर्मचारी तसेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व एसआरपीएफ अशा 6 कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
हेही वाचा - पालघरमध्ये सहा विधानसभा मतदारसंघात मतदानाला सुरुवात
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी, पोलीस, तंत्रज्ञ आणि एकूणच सर्व यंत्रणांचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आभार मानले.