पालघर - शिवसेनेला पालघर लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. सेनेला लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा देणाऱ्या आगरी सेनेत फूट पडली आहे. आगरी सेनेचे पालघर तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांनी बंडखोरी करत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आगरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाराम साळवी यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप महायुतीला पाठिंबा जाहीर केला. या निर्णयामुळे आगरी सेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले होते. याच पार्श्वभूमीवर पालघर तालुका आगरी सेनेतर्फे केळवे येथे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी आगरी सेनेचे कार्याध्यक्ष चंदूलाल घरत तसेच आगरी सेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आगरी सेना पालघर तालुकाध्यक्ष अनिल पाटील यांनी आगरी सेना नेहमीच शिवसेनेच्या विरोधात राहिली आहे. तसेच एका वर्षात ३ पक्ष बदलणारे राजेंद्र गावित लोकांचा काय विकास करणार? असा त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी शिवसेनेला पाठिंबा न देता महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला.