पालघर - वसईच्या सुरुची बाग येथील समुद्र किनाऱ्यावर पार्टीसाठी गेलेल्या तरुणांचा अतीउत्साह एकाच्या जीवावर बेतला आहे. गणेश खोत या तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बूडून मृत्यू झाला. तर इतर पाच जणांचा जीव वाचवण्यात यश आले आहे.
रविवारी दुपारी वसईतील पाच ते सहा तरुणांचा ग्रुप पार्टीसाठी वसईच्या सुरुची बाग येथील समुद्रकिनाऱ्यावर गेला होता. अतिउत्साहात पार्टीनंतर संध्याकाळच्या सुमारास सर्व तरुण समुद्रात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने या तरुणांपैकी एका जणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर इतरांचे प्राण वाचले आहेत.
गणेश पांडुरंग खोत असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून तो वसई पूर्व गोखीवरे परिसरात रहिवासी आहे. रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, आज सकाळी त्याचा मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर आढळला. या घटनेची नोंद अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.