पालघर- वैतरणा रेल्वे पुलावरून पायी जाणारी महिला वैतरणा खाडीत पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बेबी रमेश भोईर (वय 58) असे खाडीत पडलेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 4 च्या सुमारास ही घटना घडली. महिलेच्या शोधासाठी बोटीने शोध मोहीम सुरु असून या महिलेचा शोध अद्याप लागलेला नाही.
वैतरणा स्थानकातून वाढीव गावात जाण्यासाठी वैतरणा रेल्वेचा 92-93 हा पूल ओलांडून राहिवाशांना जावे लागते. दररोज सकाळ-संध्याकाळ शेकडो शाळकरी मुले, महिला, वयोवृद्ध व इतर प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन हा प्रवास करीत असतात. या रहिवाशांना जाण्या-येण्यासाठीची व्यवस्था करावी किंवा वाढीव गावासाठी रेल्वे स्थानक निर्माण करावे यासाठी अनेक वेळा मागणी करण्यात आली आहे. मात्र, लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असून रेल्वे आणि लोकप्रतिनीधींच्या उदासीन धोरणामुळेच हा अपघात झाला असल्याचा आरोप आता नागरिक करत आहेत.