पालघर - पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात एका रिक्षाचालकाने सदनिकेमध्ये फसवणूक झाल्याने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून स्वतःला पेटवून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. गणेश दामू भोर (रा. सेंट्रल पार्क, नालासोपारा), असे रिक्षाचालकाचे नाव आहे. तो ७० टक्के भाजला असून त्याच्यावर पालघर ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आला आहे.
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दलनात हा प्रकार घडला असून यात निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव देखील जखमी झाले आहेत. या रिक्षाचालकाला त्याने घेतलेल्या सदनिकेमध्ये फसवणूक झाल्यामुळे त्याने हा आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे समजते.
हेही वाचा - बोईसरमध्ये शिवसेनेला भाजपचा विरोध; संतोष जनाठे भरणार अपक्ष अर्ज
नालासोपारा येथे गणेश दामू भोर या रिक्षाचालकाने एका बिल्डरकडून सदनिका विकत घेतली होती. त्या मोबदल्यात त्याने 8 लाख रुपये बिल्डरला दिले होते. मात्र, बिल्डरने सदनिकेचा ताबा न देता ही सदनिका परस्पर दुसऱ्याला विकली याप्रकरणी गणेश दामू भोर यांनी अनेक वेळा पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचा प्रयत्न केला. गतवर्षी त्याच्या फसवणुकीबाबत नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. याबाबत गणेश भोर यांनी न्यायालयाकडे ही याप्रकरणी दाद मागण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यानंतर न्यायालयाने ही रक्कम त्याला देण्याचा आदेश बिल्डरला दिले होते. त्याप्रमाणे 6 लाख रुपये बिल्डरने गणेश यांना डिमांड ड्राफ्टने (डीडी) दिले होते. मात्र, उर्वरित 2 लाख मिळत नसल्याने गणेश हताश झाले होते. वारंवार पोलीस ठाण्याच्या चकरा मारूनही त्यांना हे पैसे प्राप्त होत नव्हते.
हेही वाचा - पालघर जिल्ह्यात सिल्वासा येथून येणारा मद्यसाठा जप्त
या प्रकरणी गणेश भोर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात ते काही पत्र घेण्यासाठी आले होते. मात्र, कागदपत्रांच्या मूळ प्रती अपेक्षित असल्याने त्यांच्याकडे तशी मागणी करण्यात आली. यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीला फोन करून मूळ कागदपत्रे मागवली. मात्र, पत्नी ही सर्व कागदपत्रे घेऊन जिल्हाधिकारी पोहोचण्या आधीच गणेश भोर यांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी संजय जाधव यांच्या दालनात हा प्रकार घडला असून गणेश यांना वाचवण्याच्या प्रयत्नात उपजिल्हाधिकारी यांचा देखील हात जखमी झाला आहे.
हेही वाचा - टेम्पो-बस अपघातात टेम्पो पुलाखाली पडला; जीवितहानी नाही