पालघर : समुद्रातील वादळी वाऱ्याचा फटका बसल्याने सातपाटीच्या किनाऱ्यावर परतणारी "प्राजक्ता" ही मासेमारी नौका दगडी बंधाऱ्यावर आदळून फुटल्याची घटना घडली आहे. या अपघातात नौकेवरील 15 मच्छीमारांचे प्राण सुदैवाने वाचले असून नौकेसह लाखो रुपयांचे साहित्य मात्र नष्ट झाले आहे.
2 ऑगस्ट रोजी सातपाटी येथील मोरेश्वर विष्णू चौधरी यांच्या मालकीची "प्राजक्ता (IND- MM-604) ही नौका मासेमारीसाठी समुद्रात रवाना झाली. परंतु 3 ऑगस्टपासून समुद्रात वादळी वारे आणि महाकाय लाटांचा फटका बसल्याने मासेमारी न करताच 4 ऑगस्टरोजी समुद्र किनाऱ्यावर परत येण्यासाठी माघारी निघाली. मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास ही नौका सातपाटी समुद्रानजीक पोहोचली. मात्र, त्याच दरम्यान मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याला सुरू झाल्याने खाडीत येण्यासाठी असणारा नौकानयन मार्ग नौकेवरील मच्छिमारांना दिसेनासा झाला. मार्ग दिसेनासा झाल्याने ही नौका दगडी बंधाऱ्यावर आदळून फुटली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून नौकेवरील 15 मच्छिमार सुखरुप आहेत. मात्र, या अपघातात नौकेसह इतर साहित्याची हानी झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.