पालघर - जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या 24 तासात 5 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये पालघर तालुक्यातील 4 व वसई ग्रामीणमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात आत्तापर्यंत एकूण 130 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यापैकी 64 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून 62 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पालघर तालुक्यात ४ रुग्ण आढळले असून बोईसर परिसरातील नवापूर नाका, भागीरथी अपार्टमेंट येथील 16 वर्षीय मुलाला कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे. दातिवरे येथील 12 व 6 वर्षीय मुलींनाही कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे. दहिसर, जांभळेपाडा येथील 44 वर्षीय व्यक्तीला देखील कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे.
वसई ग्रामीण भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत असून वसई तालुक्यातील चंद्रपाडा येथील एका 37 वर्षीय व्यक्तीमध्ये लक्षणे आढळल्याने कोरोना चाचणी केली असता, त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.