पालघर - वसई-विरार मनपातील ५ नगरसेवकांनी एकनाथ शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. तसेच विक्रमगड नगर पंचायतीमधील जिजाऊ संघटनेचे १९ नगरसेवक यांनीही सरकारला पाठिंबा दिला.
तलासरी नगर पंचायतीतील जिजाऊ संघटनेचे ५ नगरसेवक, मोखाडा नगर पंचायतीच्या १२ नगरसेवकांनी युती सरकारला आपला जाहीर पाठींबा देण्याचा निर्णय घेतला. ही माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे.
बाईसर विभागातील पदाधिकारीही शिंदेसोबत - यासोबतच वसई तालुका आणि बाईसर विभागातील प्रमुख पदाधिकारी निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, बोईसर शहरप्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समिती सदस्य कुंदन संख्ये यांनीही सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्यांच्या साथीने शिवसेनेची ठाणे ग्रामीण भागातील आमची ताकद वाढली आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केले.
यावेळी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित, आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, माजी पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा तसेच जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे उपस्थित होते.
बालेकिल्ल्यात खिंडार - या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्यासह आमदार श्रीनिवास वनगा, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख राजेश शहा, यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, महानगरपालिकेचे नगरसेवक, नगरपंचायतचे नगरसेवक, यामध्ये विक्रमगड नगरपंचायत, मोखाडा नगरपंचायत, तलासरी नगरपंचायत, यांचे नगरसेवक, काही स्थानिक पदाधिकारी, व कार्यकर्ते अशा शेकडो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाहीर प्रवेश केला आहे.
शिंदे गटात जाणारे दुसरे खासदार - पालघर चे खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटात जाणारे दुसरे खासदार आहेत. यापूर्वीच एका खासदाराने शिंदे गटात प्रवेश केला आहे. पालघर जिल्ह्यातील शिवसेनेच्या खासदार, आमदार, नगरसेवक जि प सदस्य, तसेच वसई तालुकाप्रमुख निलेश तेंडुलकर, उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, वसई तालुका उपप्रमुख तथा माजी नगरसेविका यांचे पती दिवाकर सिंग, वसई -विरार माजी स्थायी समिती सभापती सूदेश चौधरी, बोईसर शहर प्रमुख मुकेश पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य कुंदन संखे यांनीसुद्धा आपल्या शेंकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यासोबत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
शिवसेनेला सुरुंग लावण्यात एकनाथ शिंदे यशस्वी - पालघर जिल्ह्यात शिवसेनेला सुरुंग लावण्यात एकनाथ शिंदे हे यशस्वी झाल्याचे दिसत आहे. पालघर जिल्ह्यात शिवसेनेत मोठी फूट पडल्यामुळे, आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला, शिंदे गटाची मोठी डोकेदुखी होणार असल्याचे चित्र दिसत आहे. शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या खासदार, आमदार, आदी पदाधिकाऱ्यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगीकृत करून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकूण पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठी खिंडार पडल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा - State Cabinet Meeting : मंत्रिमंडळाची बैठक, शिंदे सरकार घेणार नामांतराचा पुन्हा निर्णय?