पालघर - सुर्या प्रकल्पाच्या धामणी धरणाचे 2 व 4 क्रमांकाचे दरवाजे मंगळवारी संध्याकाळी उघडण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तर, धामणी धरणातून सूर्या नदीत एकूण 6167.29 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धामणी धरण 87 टक्के पाण्याने भरल्याने शुक्रवारी सुर्या प्रकल्पच्या धामणी धरणाचे 1, 3, 5 क्रमांकाचे तीन दरवाजे 50 सेंटीमीटरपर्यंत उघडण्यात आले होते. त्यातून 2235 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यातच मंगळवारी संध्याकाळी 6.30 च्या सुमारास 2 व 4 क्रमांकाचे दरवाजे 30 सेंटीमीटर पर्यंत उघडण्यात आले. यात, आत्तापर्यंत एकूण 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धामणी धरणातून 174.81 क्युमेंक्स म्हणजे 6167.29 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुर्या नदी सुरू आहे.
धामणी आणि कवडास या दोन्ही धरणांतून एकूण 12000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुर्या नदीत करण्यात आला आहे. सकाळपासून रिपरिप सुरू असलेल्या पावसाने पालघरमध्ये जोरदार हजेरी लावली असल्याने अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून जिल्ह्यातील सूर्या आणी वैतरणा या महत्त्वाच्या नद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.