पालघर - उंबरपाडा-सफाळे व कर्दळ ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी उंबरपाडा-सफाळे व कर्दळ ग्रामपंचायत हद्दीत आजपासून १३ जुलैपर्यंत, पाच दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
उंबरपाडा- सफाळे व कर्दळ ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून १३ जुलैपर्यंत असे पाच दिवस पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या लॉकडाऊन काळात परिसरात मेडीकल स्टोअर व दवाखाने उघडे राहणार असून अत्यावश्यक सेवा म्हणून दूध, भाजीपाला विक्रेत्यांना परिसरात जाऊन विक्री करण्याची मुभा देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, बंदचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उंबरपाडा- सफाळे व कर्दळ ग्रामपंचायत आणि सफाळे पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने जनतेला करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आजवर १५४२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ५२६ रुग्णांवर उपचार सुरू असून १९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर ९९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.