पालघर (वाडा) - ठाणे आणि पालघर सीमाभागातील तानसा अभयारण्य इको सेंसेटिव्ह प्रभागात मोठ्या प्रमाणात जमीन उत्खनन व जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण केले जाते. यावर प्रतिबंध करावा, अभयारण्यापासून १० किलोमीटर प्रदूषण निर्माण करणारे उद्योग व कारखानदारी बंद करावी. याबाबत २७ फेब्रुवारी २०१९ ला सुनावणी झाली. यावर वाडा तालुक्यातील ४० हून अधिक कंपन्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.
नॅशनल ग्रीन ट्रीब्यूनल न्यू दिल्ली यांनी 105/2018 ने अपील दाखल केले होते. यावर त्या कंपन्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. या निर्णयामुळे कंपनीकडून निर्माण होणारा रोजगार व माती उत्खननात वीटभट्टी व इतर व्यवसायातील रोजगार ठप्प होणार आहेत. वाडा तालुक्यात दोनशेहून अधिक युनिट या निर्णयामुळे प्रभावित होणार आहेत. येथील कारखानदारी बंद आणि स्थलांतरीत होत आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न उद्भवत आहे. रोजगार नाही म्हणून येथील बेरोजगार स्वयंरोजगार म्हणून वीटभट्टी व खदान व्यवसायाकडे वळला आहे. वाडा तालुक्यात कोकाकोला, ओनिडा, एस्सल प्रोपॅक यासारख्या मल्टीनॅशलन कंपन्या रडारवर आहेत. या कंपन्यामध्ये मोठ्या संख्येने रोजगार उपलब्ध होत असतो. जर या कंपन्या बंद पडल्या तर रोजगाराचा गंभीर प्रश्न तयार होतो.
दरम्यानच्या काळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडून वाडा तालुक्यातील ४० हून अधिक कंपन्यांना बंद करण्याच्या नोटीसा दिल्या होत्या. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला पाठविलेल्याा सुधारीत प्रस्तावावर विचार सुचविण्यात आले आहे. त्यामुळे आज दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे.