पालघर - जिल्ह्यातील विरारच्या अर्नाळा बंदरपाडा येथे आजीच्या मागे जाण्याच्या नादात ४ वर्षीय बालकाचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. हितांश मेहेर असे या मुलाचे नाव आहे.
सोमवारी दुपारी २ च्या सुमारास हितांश हा पाणी भरण्यासाठी गेलेल्या आजीच्या मागे गेला होता. त्यानंतर काही वेळातच तो दिसेनासा झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काही पत्ता लागला नाही. अखेर संध्याकाळी ७ च्या सुमारास बंदरपाडा येथील उघड्या गटारात त्याचा मृतदेह सापडला.
हेही वाचा - विविध मागण्यांसाठी कम्युनिस्ट पक्षाकडून मोर्चा; वाडा प्रांत अधिकारी कार्यालयासमोर दिला ठिय्या
अर्नाळा येथील उघड्या गटारांमुळे येथील नागरिक त्रस्त आहेत. याबाबत अनेकदा ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या असूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळेच हितांशचा मृत्यू झाला असल्याचा आरोप संतप्त ग्रामस्थ करत आहेत.
हेही वाचा - शेतीला व्यवसायाची जोड, कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना मिळतेय आर्थिक स्थैर्य