पालघर- जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ऐनशेत येथील गावकऱ्यांची एकजूट आणि सामुदायिक निश्चय यामुळे संपूर्ण गावाची सुरक्षा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद होणार आहे. या अभिनव उपक्रमाला ग्रामपंचायतीसह दानशूर व्यक्ती आणि गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी हातभार लावला आहे. त्यामुळे गावातील सुरक्षिततेबरोबरच मालमत्तेचे रक्षण आणि जीवघेण्या घटनांपासून संरक्षण एका अत्याधुनिक यंत्रणेद्वारे तेथील गावक-यांनी मिळविले आहे.
पालघर जिल्ह्य़ातील ऐनशेत हे गाव वाडा नगरपंचायतीच्या शहर हद्दीलगत असून या गावाची लोकसंख्या 1500च्या आसपास आहे. या गावातील ग्रामस्थांनी सामुदायिक काम आणि सुरक्षेबाबत तडजोडी नको म्हणून गावातील ग्रामपंचायत, गणेशोत्सव मंडळे आणि दानशूर लोकांनी 1 लाख 52 हजार रुपयांची मदत देऊन सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी केले आहेत. या गावात येणारे फेरीवाले, इतर विक्रेते आणि सर्वसामान्यांवर या कॅमेऱ्यांवर नजर राहणार आहे.
भविष्यात गावामध्ये चोरीची प्रकरणे घडू नयेत व अघटीत प्रसंग निर्माण होऊ नयेत. यासाठी ही सुरक्षेची संकल्पना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पुढे आल्याचे ग्रामस्थ दिपक ठाकरे सांगतात. गावासाठी लोकवर्गणीतून एकूण 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यांचे नियंत्रण हे ग्रामपंचायत कार्यालयातून केले जात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.