पालघर (वाडा) - तालुक्याच्या खुपरी गावातील २१ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. या सर्व रुग्णांना वाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी ठाणे येथील रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी प्रदीप जाधव यांनी ई टिव्ही भारतशी बोलताना सांगितले.
वाडा तालुक्यातील खुपरी ही ग्रामपंचायत अर्थिकदृषट्या प्रबल मानली जाते. या ग्रामपंचायत हद्दीत औद्योगिक कारखान्याचे जाळे आहे. तर या गावातील लोकसंख्या ३ हजारहून अधिक आहे. या गावातील नाईकपाडा,चौधरी पाडा, बौद्धवाडा या ठिकाणचे रूग्ण वाडा ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार घेत आहेत.
गावात डेंग्यूची लागण पाणीसाठ्याची स्वच्छता, फवारणी होत नसल्याने झाल्याचे उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांनी सांगितले. येथील ९ रूग्णांच्या रक्ताचे नमुने डहाणू येथील लॅबमध्ये पाठविण्यात आल्याचे तालुका आरोग्य अधिकारी संजय बुरपल्ले यांनी सांगितले.
या ठिकाणी महिनाभरापुर्वी ग्रामपंचायत सदस्याला डेंग्यू झाला होता. त्यावेळी पाणीसाठ्याच्या ठिकाणी फरवाणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. मात्र, फवारणी केली गेली नाही, असे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांनी सांगितले. या प्रकरणी सभापती अश्विनी शेळके, गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे सहाय्यक पल्लवी सस्ते व तालुका आरोग्य अधिकारी संजय बुरपल्ले आणि सहकाऱ्यांनी खुपरी गावाची पहाणी केली.