पालघर - ग्रामीण भागामध्ये १४ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १३ रुग्ण पालघर तालुक्यातील असून एक रुग्ण वसई ग्रामीण भागातील आहे. चिंताजनक बाब म्हणजे पालघर तालुक्यातील बोईसर येथील भंडारवाडा परिसरात ११ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
नव्याने आढळलेल्या या रुग्णांच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा काही ददिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या संपर्कात आल्याने १४, ६, ५ वर्षीय तीन मुलांना आणि ६, ४ वर्षीय दोन मुलींना व ३०, ४८, ५५, ४५ वर्षीय या चार महिलांसह ५४, २९ वर्षीय दोन पुरुषांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच बोईसर येथीलच टाटा हाऊसिंग कॉलनी येथील ४० वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याची कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
पालघर शहरातील विष्णूनगर येथील ५८ वर्षीय महिला कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिलाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच वसई ग्रामीणमध्ये देखील एक कोरोना रुग्ण आढळून आला असून, अर्नाळा-एसटीपाडा येथील ३८ वर्षीय महिलेला देखील कोरोनाची बाधा झाली आहे.
ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४९ वर पोहोचली असून ७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पालघर तालुक्यातील ३, वसई ग्रामीण मधील २, अशा एकूण ५ रुग्णांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे ६८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.