पालघर - वसई पश्चिमेकडील ६० वर्षीय कोरोना पॉझिटीव्ह महिलेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या वसई पश्चिमेकडील भाबोळा येथील रुग्णालयात उपचार घेत होत्या. तर चार दिवसाच्या चिमुकल्याला कोरोनाची बाधा झाल्याने परिसरातील नागरिकांची मने हेलावून गेली. दरम्यान आज वसई विरार शहरात नवीन १५ रुग्ण आढळून आहेत.
माता बाल संगोपन केंद्रातील ७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये दोन नर्स, दोन वॉर्ड बॉय, एक आया आणि उपचारासाठी आणलेल्या ४ दिवसाचे बाळ आणि त्याच्या वडिलांचा समावेश आहे. तसेच इतर ६ रुग्ण हे पूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे माता बाल संगोपन केंद्र सील करण्यात आले आहे.
आज आढळलेले १५ रुग्ण पकडून आता महापालिका हद्दीत कोरोना बाधितांचा आकडा ८० वर पोहोचला आहे. यामध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. वसई-विरार महापालिकेच्या वसई येथील सर डी. एम. पेटिट रुग्णालयात ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. यामध्ये ४ नर्स आणि २ तरुणांचा समावेश आहे. इतर १६८ कर्मचाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अद्याप त्यांचा अहवाल प्राप्त झाला नाही. तसेच हे रुग्णालय देखील सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.