उस्मानाबाद - कळंब आगारातील चालक भीमराव रंगनाथ खराटे (52) यांचा मृतदेह मे महिन्यात केज तालुक्यातील मांगवडगावाच्या एका शिवारातील विहिरीत आढळून आला होता. त्यावेळी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, 3 महिन्यानंतर सदरील प्रकरणाचा उलगडा झाला आहे. भीमराव खराटे यांच्या पत्नीने मुलगा आणि प्रियकराच्या मदतीने खून केल्याचे समोर आले आहे.
पत्नीने सिनेस्टाईल काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार -
कळंबमधील बस चालकाचा पत्नी आणि मुलानेच खून केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, भीमराव रंगनाथ खराटे वय 52 वर्षे राहणार भोगजी तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद असे मृताचे नाव आहे. ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. 29 मे 2021 रोजी मांगवडगाव तालुका केज शिवारातील धनराज थोरात यांच्या शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाच्या घटनेचा उलगडा आता झाला आहे.
प्रेमसंबधात अडसर ठरल्याने...
राधाबाई खराटे व महादेव ऊर्फ बबन खराटे यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, यात पती भीमराव याचा अडथळा ठरत होता. शिवाय त्याला संपवल्यानंतर एसटी महामंडळातील सेवा व कालावधीचे पैसे मिळतील. तसेच मुलगा सिद्धेश्वर याला अनुकंपा तत्त्वावर नोकरीला लावता येईल. यामुळे खून केल्याचे तक्रारीत नमूद आहे. राधाबाई व महादेवने रचलेल्या भीमरावच्या खुनाच्या कटात सिद्धेश्वरला सामावून घेतले. हत्या करुन आत्महत्येचा बनाव करून राधाबाई खराटे व महादेव यांनी भीमरावचा कट रचून खून केला. त्यास विहीरीत बुडवून मारल्यानंतर आत्महत्या भासविले. मांगवडगाव तालुका केज येथे 11 सप्टेंबरला समोर आला आहे. याप्रकरणी, 11 सप्टेंबरला न्यायालयीन आदेशावरून पत्नी, प्रियकर आणि मुलाविरोधात विविध कलमान्वये युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - बहुतांश स्त्रिया अंतर्वस्त्राच्या 'या' प्रकारांपासून अनभिज्ञ
पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास केली होती टाळाटाळ -
ओळख पटल्यानंतर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली होती. दरम्यान, मृत भीमराव यांचे बंधू बालाजी रंगनाथ खराटे यांना भीमराव खराटे यांची पत्नी तिच्या प्रियकरावर व मुलावर संशय होता. त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला नाही. त्यामुळे शेवटी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. केज येथील न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले आहे.
अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल -
त्यानुसार 11 सप्टेंबर रोजी रात्री बालाजी रंगनाथ खराडे यांच्या तक्रारीवरून भीमराव यांची पत्नी राधाबाई भीमराव खराटे (48) महादेव ऊर्फ बबन अच्युत खराटे वय (40) व मुलगा सिद्धेश्वर भीमराव खराडे (वय 28, सर्व रा. भोगजी, ता. कळंब) यांच्याविरोधात युसुफ वडगाव ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सध्या तिन्ही आरोपी फरार असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय आटोळे करीत आहेत.
पुरावे न्यायालयात सादर -
घटना उघडकीस आणण्यासाठी फिर्यादी यांनी काही फोन रेकॉर्डिंग, कळंब शहरातील परळी रोडवरील काही हॉटेल आणि दुकानातील सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात जमा केले आहे. ज्यामध्ये नमूद तारखेला मृत भीमराव खराटे, आरोपी राधाबाई खराटे आणि महादेव खराटे एका मोटारसायकलवर जाताना दिसत आहेत. या सर्व बाबींची दखल घेत न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. या घटनेने कळंब तालुक्यात खळबळ उडाली आहे.