उस्मानाबाद - भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे यांचे महाविकास आघाडीमध्ये स्वागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे आज उस्मानाबाद येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कडवट आणि कट्टर कार्यकर्ते भाजप सोडून जात आहेत याचा विचार भाजपने करायला हवा. खडसे आणि आम्ही जुने मित्र आहोत, खडसे यांचे राज्यात भाजप वाढवण्यासाठी फार मोठे योगदान आहे. यशाची शिखरे पादाक्रांत करताना पायाचे दगड ठिसुळ का होत आहेत याचा भाजपने विचार करावा. दरम्यान खडसेंना आता मंत्रीपद मिळणार का? या प्रश्नावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, प्रथम खडसे महाविकास आघाडीमध्ये दिसू द्या, मंत्रीपदाबाबत नंतर निर्णय घेऊ.