उस्मानाबाद - लोकसभा निवडणुकीसाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद मतदारसंघातही आज मतदान होत आहे. दरम्यान, मतदान केंद्रांमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी असताना सुद्धा येथील एका मतदान केंद्रावर एका मतदाराने चक्क मतदान करतानाचे फेसबुक लाईव्ह केले आहे. प्रणव पाटील असे त्या मतदाराचे नाव असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याची चर्चा आहे. त्याने केलेला मतदानाचा फेसबुक लाईव्ह सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आज सकाळी प्रणव पाटील हा मतदान केंद्रावर मतदानासाठी आला असता, त्याने मतदान करतानाचे फेसबुक लाईव्ह केले आहे. विशेष म्हणजे या महाभागाने चक्क व्हीव्हीपॅटचे दृश्य व्हायरल केले आहे. या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र, या प्रकरणावरून वाद निर्माण होताच प्रणव पाटील याने तो व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवला आहे.