उस्मानाबाद - जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील काटी येथील महात्मा तरुण मंडळ आणि सावता परिषदेच्या माध्यमातून बाळासाहेब भाले यांनी स्वखर्चातून सॅनिटायझर प्रवेशद्वार सुरू केले आहे.
![कोरोनाला रोखण्यासाठी सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करुनच गावात प्रवेश](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-osm-rut-01-korona-care-7204246_12042020124039_1204f_1586675439_905.jpg)
शासन स्तरावरुन करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत असून काटी ग्रामपंचायतीच्या वतीनेही अनेक पावले उचलले जात आहेत. त्यासाठी गावातील सामाजिक कार्यकर्तेही पुढे येत आहेत. येथील ग्रा.प. सदस्य बाळासाहेब भाले यांनी स्वखर्चातून सुरू केलेल्या मंडप प्रवेशद्वारात गावात येणाऱ्या प्रत्येकाला सॅनिटायझरने फवारणी करत निर्जंतुकीकरण करूनच प्रवेश दिला जात आहे.
काटीसह परिसरातील नागरिक कोरोनाच्या संसर्गामुळे गर्भगळीत झाले आहेत. त्यामुळे कोरोना सहाय्यता कक्षाच्या वतीने मास्क घालणे, रुमालाने तोंड झाकणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुती हातरुमाल वापरणे या संदर्भात सुचना केल्या जात आहेत. तसेच गावात प्रवेश देताना नाव, गाव, मोबाईल नंबर, कामाचे स्वरूप आदी बाबी रजिस्टरमध्ये नोंदवून त्यांना सॅनिटायझरने निर्जंतुकीकरण करून मगच प्रवेश देण्यात येत आहे. त्याच बरोबर कोरोना सहाय्यता कक्षासमोर नागरी सुविधेसाठी गावातील पाच गरीब कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटपही करण्यात आले आहे.