उस्मानाबाद - राष्ट्रीय महामार्गावर जकेकूर-चौस्ता येथील स्वामी पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात बहिणीचा मृत्यू झाला असून भाऊ गंभीर जखमी आला आहे.
कोराळे येथील मोहिनी चोपडेचा (वय २०) विवाह ६ मे रोजी ठरविण्यात आला होता. तर भाऊ राहुल चोपडे पुण्यामध्ये कंपनीत कामाला असून तो काही दिवसांपूर्वी कार्यक्रमानिमित्त घरी आला होता. बहिणीचे लग्न असल्याने साहित्य खरेदीसाठी दोघे बहिण-भाऊ उमरग्याकडे मोटारसायकलवरून (एमएच १३ बीजी २९९३) निघाले होते. गाडीत पेट्रोल टाकून चौरस्त्याच्या दिशेने जाण्यासाठी पंपाच्या बाहेर निघाल्यानंतर भरधाव वेगाने निघालेल्या कारने (एमएच १७ एजे ५००) चुकीच्या दिशेने येऊन जोरदार धडक दिली. त्यात मोहिनी राजेंद्र चोपडे हिच्या डोक्याला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर राहुलच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. राहुलला उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले आहे.
हेही वाचा - सरकारी कारकून, बांधकाम मजूर ते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ