उस्मानाबाद - जिल्ह्यासाठी गुरुवार घातक ठरला असून यादिवशी कोरोनाचे 2 रूग्ण सापडल्याने खळबळ उघडली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी 2 रुग्ण सापडल्याची माहिती दिली. एक रुग्ण पानिपत येथून उमरगा येथे आला आहे, तर दुसरा मुंबई येथील हॉटेल ताज येथून.
यातील दुसरा रुग्ण लोहारा तालुक्यातील धानोरी येथील राहणारा असून तो काही दिवसांपूर्वी मुंबईतून आला होता. कोरोनाचा रुग्ण हा मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये वेटरचे काम करीत असून त्याची तपासणी केल्यानंतर रुगणाला कोरोना झाल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले. जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी याबद्दलची माहिती दिली.
हा रुग्ण मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये कामाला असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हॉटेलच्या सर्व कर्मचारी यांचे स्वॅब घेऊन त्यांना होम क्वरंटाइन केले होते. त्यानंतर तो येनेगुरपर्यंत भाजीपाला गाडीत प्रवास करत आला, तर त्यांनतर दुधाच्या वाहनात बसून गावी आला. या रुग्णाच्या संपर्कातील 25 जणांची यादी प्रशासनाने तयार केली असून त्यांना गावातील शाळेत ठेवण्यात आले आहे. त्यांची स्वॅब तपासणी होणार आहे. तर, रुगणाला तुळजापूर येथील उपजिल्हा रुगणलायत ठेवण्यात येणार आहे.