उस्मानाबाद - कोरोनाच्या सावटाखाली राज्य सरकारने राज्यातील धार्मिक स्थळ उघडण्याचा निर्णय घेतला. यानंतर दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तापासून राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली. तुळजाभवानीचे मंदिरही सुरू करण्यात आले आहे. मात्र, येथे सेलिब्रिटी आणि व्हीआयपी यांच्यासह सामान्य भाविकांनी एकच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दर्शनासाठी मर्यादा -
मंदिर उघडताच परिसरामध्ये दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. दररोज फक्त 4 हजार भाविकांना तुळजाभवानीचे दर्शन घेण्याची मर्यादा सकाळी सकाळीच संपत आहे. भाविकांची संख्या दिवसेंदिवस अधिकाधिक होत आहे. त्यातच व्हीआयपी लोक दर्शनासाठी हजेरी लावत आहेत. आमदार आशुतोष काळे आणि अभिनेत्री नेहा पेंडसे यांनी सहकुटुंब व्हीआयपी कोट्यातून देवीचे दर्शन घेतले. तुळजाभवानी मंदिरात यापूर्वी देखील व्हीआयपी दर्शनाचा मोठा घोळ समोर आला होता. आताही त्याचीच पुनरावृत्ती होताना दिसत आहे.
हेही वाचा - अनलॉकनंतर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरातील परिस्थिती व कोरोना नियमांचे होणारे पालन
मंदिर प्रशासनाचा दुजाभाव -
लहान मुलांना दर्शनासाठी मनाई असतानाही राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आपल्या १० वर्षाखालील मुलाला घेऊन तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. तर अभिनेत्री नेहा पेंडसेने पोलीस बंदोबस्तात देवीचे दर्शन घेतलं आहे. दर्शन पास काऊंटर बंद असतानाही या मंडळींना देवीचे दर्शन प्रशासनाने घडवून दिल्याने सामान्य भाविक आणि व्हीआयपी भाविक यात प्रशासनाने दूजाभाव केल्याचे पाहायला मिळते आहे