उस्मानाबाद - कोरोना विषाणूचा वाढता आलेख रोखण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्ण आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर एकाच कक्षात उपचार करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
तालुक्यातील तोरंबा गावातील दाम्पत्य आपल्या आठ वर्षाच्या मुलाला घेऊन रुग्णालयात दाखल झाले होते. संबधित लहान मुलाला सर्दीची अॅलर्जी आहे. मुलाला लहान असल्यापासून हा त्रास असून तिन्ही ऋतुमध्ये त्याला सर्दीचा त्रास होतो. त्यामुळे याच्यावर वेळोवेळी खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. 10 जुलैला त्याला थंडीमुळे पुन्हा सर्दीचा त्रास होण्यास सुरुवात झाल्याने तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपजिल्हा रुग्णालयात आल्यानंतर याच्यावर अॅलर्जी प्रमाणे उपचार करण्याऐवजी कोरोना विषाणूची लागणं झाल्याचे गृहीत धरून डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार करण्यास सुरुवात केली.
धक्कादायक बाब म्हणजे, या मुलाला चक्क कोरोनाबाधित रुग्णांच्या जवळील बेड देण्यात आला आणि येथेच आय.सी.यु. कक्षात त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. या मुलाच्या सोबतच इतर रुग्ण होते. ज्यांना अस्थमा, शुगर वृद्धापकाळाने आलेले आजार होते. मात्र, सर्वच रुग्णांना कोविड 19 ची तपासणी करण्यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णाच्या कक्षात ठेवण्यात आले होते.
सदरील मुलाच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिवसभर डॉक्टरांना विनंती केली की, माझ्या मुलाला सर्दीचा त्रास आहे. हा त्रास नेहमीचाच आहे. खबरदारी म्हणून त्याची कोरोना चाचणी करा. मात्र, चाचणीपूर्वी त्याला दुसऱ्या कक्षात पाठवा. त्याच्या बाजूच्या बेडवर कोरोनाबाधित रुग्ण असल्याने त्याला कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे, अशी विनंती मुलाच्या आई-वडिलांनी डॉक्टरांना केली.
तसेच हा प्रकार रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.चंचला बोडके यांच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉ. बोडके यांनी दुर्लक्ष केले. येथे जे रुग्ण येतात, यांच्याकडे आम्ही कोरोनाबाधित रुग्ण म्हणूनच पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर 15 जुलै रोजी मुलाचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला. मात्र सर्दीचा उपचार न करताचा त्याला दुसऱ्याच दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान वेगवेगळ्या आजाराच्या रुग्णांना एकत्र ठेवणे, हे संसर्गाचे लक्षण ठरू शकते का, यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे यांच्याशी चर्चा केली. त्यावर, साथीच्या कालावधीच आरोग्य संघटना सूचना देते, कोणीही मनाने काही करत नाही. रुग्णालयात कुठलाही रुग्ण आला, तरी अशा रुग्णाला संशयित म्हणून पहावे, अशा सूचना आम्हाला जागतिक आरोग्य संघटननेकडून आहेत, असे त्यांनी सांगितले.