उस्मानाबाद - कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून शाळा बंद असल्याने दिवसभर घरात बसून कंटाळा येतो. हा कंटाळा दूर करण्यासाठी लहान मुले शेतातील विहिरीत पोहताना दिसत आहेत. यावेळी सोशल डिस्टंन्सिंग धाब्यावर बसवल्याचे चित्र आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि या लॉकडाऊन दरम्यान लहान मुलांनाच नव्हे, तर सर्वानाच घराच्या बाहेर पडणे मुश्कील झाले. सध्या अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरी, राज्यातील जलतरण तलाव अद्यापही बंद आहे त्यामुळे लहान मुले आणि त्यांचे पालक विहिरीत मनसोक्त पोहताना दिसत आहेत. तसेच जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून धो-धो पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या नद्या-नाले आणि विहीरीसुद्धा तुडुंब भरलेल्या आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले, तरी पोहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी साठल्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला आहे.