उस्मानाबाद- राज्यात स्त्री सुरक्षा, शेतकऱ्यांची आत्महत्या, सिंचनाच्या सोयी इत्यादी प्रश्न महात्वाचे आहे. निरर्थक मुद्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, असे सावरकरांबद्दल सुरू असलेल्या वादावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपले मत मांडले.
पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी राजू शेट्टी उस्मानाबादला आले होते. यावेळी 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना शेट्टी यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सोडून महाराष्ट्र भाजपमधील सर्वच नेते ओबीसीसह सर्वच घटकांवर अन्याय करतात, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. त्याचबरोबर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल सुरू असलेल्या वादावर बोलताना यापेक्षा गंभीर मुद्दे सध्या आमच्या समोर उभे आहेत. अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुष्काळ, सिंचन या सारखे अनेक प्रश्न आहेत. निरर्थक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करायला हवे, असे शेट्टी यांनी सांगितले.
तसेच, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायला हवा. महाविकास आघाडीचा समान कार्यक्रम असून त्यामध्ये शेतकरी कर्जमुक्ती आणि कृषी पंपाचे वीज दर हे मुद्दे अतिशय वरच्या थरावर आहे. सोबतच, १ रुपये १६ पैसे दराने वीज देणे अशा मुद्द्यांना प्राधान्य द्यावे व सरकारने लवकर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, अशी आमची भूमिका असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
हेही वाचा- सोबतीला आहे महाराष्ट्र सारा.., शेतकऱ्याने काळ्या जमिनीवर रेखाटले शरद पवारांचे छायाचित्र