उस्मानाबाद - राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिल्ह्यातील आठ तरुण-तरुणींनी यशाला गवसणी घातली आहे. तर जिल्ह्यातील एसटी बस वाहकाच्या मुलगा देखील उपजिल्हाधिकारीपदी विराजमान झाला आहे. शुक्रवारी राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा निकाल लागला असून यात कळंब तालुक्यातील बोर्डा गावचा रहिवासी रवींद्र अप्पादेव शेळके या तरुणाने राज्यात दुसरा क्रमांक पटकवत उपजिल्हाधिकारी पद पदरी पाडले आहे.
रवींद्रचे वडील अप्पादेव शेळके हे कळंब एसटीत वाहक (कंडक्टर) या पदावर नोकरीतून निवृत्त झाले आहेत. रवींद्र शेळके यांना एकूण 582 गुण मिळाले असून तो राज्यातील उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. एका वाहकाचा मुलगा उपजिल्हाधिकारी झाल्याने बोर्डा गावासह पंचक्रोशीतही आनंद व्यक्त केला जात आहे.
तर शेळकेंबरोबरच जिल्ह्यातील इतर सात जणांनी या परीक्षेत यश मिळवले आहे. उस्मानाबादच्या वृषाली अनिल केसकर (तहसीलदार), ज्योत्स्ना प्रकाश मुळीक- भूम (तहसीलदार), विशाल क्षीरसागर - (पोलीस उप-अधीक्षक) व रेणुका कोकाटे-कुंभेजा (तहसीलदार), अजिंक्य अशोक गोडगे-रोसा, परंडा (उपजिल्हाधिकारी), मुळचे सांगलीचे व सध्या उस्मानाबाद जीवनोन्नती अभियानचे लेखाधिकारी आप्पासाहेब पवार (पोलीस उप-अधीक्षक) व मुळचे सोलापूर जिल्ह्यातील व उस्मानाबादेत उपशिक्षणाधिकारी असलेल्या रत्नमाला गायकवाड (राज्य उत्पादन शुल्क उपाधीक्षक) आदींनी यश संपादन केले आहे.
हेही वाचा - अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोन महिला शिक्षिकांचा मृत्यू