उस्मानाबाद - शिवसेना आणि भाजपाने लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रभर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षाला खिंडार पाडून मेगा भरती सुरू केली. मात्र, आता सेना भाजपातील विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या बंडखोर नेत्यांची गळती सुरू झाली आहे. उस्मानाबादमध्ये सेना-भाजपामध्ये मेगा गळती होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मातब्बर असलेल्या नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला असाच जंगी प्रवेश राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य डॉ.पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणाजगजितसिंह पाटील यांनी केला. शरद पवारांच्या जवळचे असलेले नातेवाईक भाजपात गेल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्याचबरोबर शिवसेनेतही काही लोकांनी प्रवेश केला. मात्र, आता शिवसेना आणि भाजपातील नेत्यांनी बंडाचे निशाण उभारले असून या बंडखोर नेत्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. पाटलांच्या भाजपा प्रवेशाने राष्ट्रवादीमध्ये मोकळीक झाली होती. त्याचबरोबर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे आहे. त्यामुळे बंडखोरांचा कल राष्ट्रवादीकडे जाण्याचा आहे.
शिवसेनेच्या नेत्यांनी राजीनामासत्र देण्यास सुरू झाले आहे. राणाजगजितसिंह पाटील भाजपात गेल्याने नुकतेच भाजपात रुजू झालेले प्रतापसिंह पाटील, सुरेश पाटील यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान शिवसेनेत दाखल झालेले संजय पाटील दुधगावकर संजय निंबाळकर यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेनेचे भूम तालुकाप्रमुख सुरेश कांबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भाजप-सेनेच्या मेगा भरती नंतर अत्ता मेगा गळती सुरू झाली असल्याचे जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.