उस्मानाबाद - अतिृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी 'मी पुन्हा येईन' असे शरद पवार म्हणाले आहेत. मागील दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.
शरद पवार यांच्या नियोजित दौऱ्यामध्ये तुळजापूर, लोहरा, उमरगा, लातूर जिल्ह्यातील उजनी गावासह उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्याचा समावेश होता. या सर्व नियोजित ठिकाणी शरद पवार भेटी देणार होते. मात्र, शरद पवारांनी जिल्ह्यातील परंडा या तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली नाही.
सोमवारी सकाळी त्यांनी अचानक दौरा रद्द करून बारामतीला जाणार असल्याचे सांगितले. तत्पूर्वी नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, असे सांगितले. तसेच परांड्याला न जाण्याचे कारणही त्यांनी सांगितले.
रविवारी परंड्यात झालेल्या पावसामुळे हेलिपॅड खराब झाले आहे. त्यामुळे तिथे हेलिकॉप्टर उतरण्यास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या भागाची पाहणी करण्यासाठी मी पुन्हा येईन, असे म्हणाले.
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह अनेक गावांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. रविवारी त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील काही नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यावेळी पवार म्हणाले, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, सोलापूर जिल्ह्याचा, पंढरपूर परिसराचा भाग या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर भागात असंच चित्र आहे. उस्मानाबाद हा सबंध जिल्हाच संकटात असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रवर आलेले हे संकट ऐतिहासिक असल्याचेही पवार यावेळी म्हणाले. तर विरोधकांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसह शेतकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करण्याची मागणी केली.