उस्मानाबाद- शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीबरोबर विविध मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
पेरणीसाठी शेतकऱ्यांना एकरी दहा हजार रुपये देणे, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान निधी अंतर्गत कपात केलेली शेतकऱ्यांची २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना परत करणे, रासायनिक खतांची केलेली भाववाढ मागे घणे, खते, बी-बियाणे, कीटकनाशके कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करणे, यासह विविध मागण्यांचे निवेदन, संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून बँकांकडून पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे सांगत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मदत करावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाने लक्ष घालून सरसकट त्यांची कर्जमाफी करावी. अशी मागणी या आंदोलनावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान सरकार विरोधी घोषणाही देण्यात आल्या होत्या. यावेळी डॉ. संदीप तांबारे अतुल गायकवाड, अर्चनाताई अंबुरे, तानाजी चौधरी, आकाश मुंडे, प्रतापसिंह गरड, मोहन जाधव, रवींद्र अंबुरे, आदित्य देशमुख आदी उपस्थित होते